नाशिक - बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात अनेक गैरसोयी आहेत. त्या दूर करून रुग्णांना अनुकूल सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात बागलाण तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून यात सुधारणा न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तालुक्यातील कोरोनाबाधित व संशयित रुग्णांसाठी अजमीर सौंदाणे येथे कोविड १९ सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील व परिसरातील सर्व रुग्णांची व्यवस्था येथे करण्यात येत आहे. मात्र, येथे उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांनी गैरसोयींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. बागलाण तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता याठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधांची नितांत गरज आहे. पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिले आहे. कोरोना महामारीवर अद्याप कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना संपूर्ण सकस आहार, पिण्यासाठी शुद्ध व गरम पाणी मिळावे, अशी मागणी केली आहे.
शासनाकडून यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्यास रुग्ण ज्या गावातील आहेत तेथील ग्रामपंचायतीकडून १४ व्या वित्त आयोगामार्फत सदरचा खर्च भागविणे शक्य आहे. त्यामुळे अजमीर सौंदाणे येथील कोविड १९ सेंटरमधील सर्व रुग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ते प्रयत्न करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सनदशीर मार्गाने उपोषण व आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.