नाशिक - सध्याच्या सरकारने दिलेली कर्जमाफी म्हणजे ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांसाठी केवळ ३० हजार कोटी रुपयांची कर्ज माफी केली आणि दुसरीकडे उद्योजकांना १ लाख ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाची किंमत देण्याची या सरकारची लायकी नसल्याची घणाघाती टीकाही पवारांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांच्या घामाची किंमत देऊ न शकणाऱ्या या सरकारला पाय उतार करण्याची तुमची-आमची जबाबदारी असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून चांदवड येथे जे. आर. डी. हायस्कूलमध्ये दिंडोरी लोकसभा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, की काँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या होत होत्या. त्यावेळी कुठलाही विलंब न लावता ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. तसेच व्याजदरात कपात करून पुन्हा नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या उत्पादनाने भारत जगात तांदूळ निर्यात करणारा पहिल्या क्रमाकांचा देश बनला. हा त्यावेळच्या कर्जमाफीनंतरचा बदल होता.
नुकताच देशातील सैनिकांवर काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी चळवळीत सहभागी झालेल्या युवकांनी हा हल्ला केला. त्यानंतर लष्कराला कारवाई करण्याचा अधिकार दिला, असे सरकारने सांगितले. यामध्ये हवाई दलाने कारवाई करून दहशतवाद्यांची स्थळे उद्ध्वस्त केली. यामधून आम्ही भारतीय कुणाच्या वाटेला जात नाही. आमच्या वाट्याला कोणी गेले, तर आम्ही त्यांना सोडणार नाही, हा संदेश दिला गेला. देशाच्या ऐक्याचा ज्यावेळी प्रश्न येतो, तेव्हा पक्षभेद राजकारण बाजूला सोडून एकत्र येण्याची गरज असते. त्यादृष्टीने एकत्र येऊन सैनिकांना त्यांचा निर्णय घेण्याची मोकळीक देऊन त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे जवानांनी शौर्य दाखवले. हा चर्चेचा विषय नसून आपण सैन्याच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
'म्हणून युद्ध सदृश परिस्थिती निर्माण केली जाते आहे'
गेल्या ५ वर्षांच्या काळात सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने नुकत्याच झालेल्या ३ राज्यांतील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. ज्या राज्यात भाजपची सत्ता होती, त्याच सरकारला सत्ता गमवावी लागली. याचा अर्थ वातावरण भाजपच्या विरोधात असून आगामी निवडणुकीत नक्की बदल होईल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सध्या युध्द सदृश परिस्थिती निर्माण केली जात असल्याची टीका त्यांनी केली.
पवार पुढे म्हणाले, की युद्ध सदृश परिस्थितीत सापडल्याने जिनिव्हा कराराचा फायदा झाला आणि त्यातून अभिनंदनची सुटका झाली. त्यानंतर अभिनंदन यांच्या पत्नीला भाजपला श्रेय घेऊ नये, असे सांगण्याची वेळ आली. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर जनता नाराज असल्याचे त्यांनी सांगितले. मनमोहन सिंग सरकारच्या काळात राफेल ५६० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय झाला होता आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएएलला देण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र भाजपकडून राफेल विमान साडेपंधराशे कोटी रुपयांना खरेदी केली जात आहे आणि त्याच्या दुरुस्तीचे काम एचएएलला न देता अंबानींच्या कंपनीला दिले जात आहे. एकीकडे पंतप्रधान न खाऊंगा न खाणे दुंगा, अशी भाषा करतात. त्यामुळे पंतप्रधानांचे यात गौडबंगाल आहे, अशी टीकाही त्यांनी केली.