नांदगांव (नाशिक) - ना बँड, ना बाराती, नुसती कोरोनाची भिती, अशीच काहीशी परिस्थिती सध्या देशभरात सुरू आहे. मग ठरलेले लग्न सोहळे करायचे कसे? असा प्रश्न सर्वाना सतावत आहे. यावर नामी शक्कल लढवत चक्क मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, फेसबुकवर लाईव्ह लग्न सोहळा पार पाडत एक चांगला आदर्श उभा केला आहे, नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी. त्यांच्या या लग्न सोहळ्याचे जिल्हाभर कौतुक होत आहे. लॉकडाऊन, संचारबंदी या सर्वांवर नामी शक्कल लढवत त्यांनी आज मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडले.
लग्न म्हटलं, की मोठा गाजावाजा डीजे, ढोल-ताशा, शाही मंडप आणि खाण्यापिण्याची चंगळ. त्यात राजकीय घराण्यातील लग्न म्हटले तर विचारूच नका. वडील माजी आमदार, स्वतः जिल्हा परिषद सभापती तरीही अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत फेसबुक लाईव्हद्वारे लग्न केलं आहे, नांदगांव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान महिला व बालकल्याण सभापती आश्विनी आहेर यांनी. काही दिवसांपूर्वी त्यांचे लग्न ठरले व साखरपुडाही झाला. मात्र त्यानंतर कोरोनाचे संकट आले आणि देशहितासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली.
काही दिवसांनी परिस्थिती सुधारेल आणि मग लग्नाचा बार उडवू, असे आहेर कुटुंबाने ठरविले. मात्र परिस्थिती अजून बिकट झाली व सर्वच सोहळ्यावर बंदी आणण्यात आली. या काळात दोन्ही कुटुंबातील मिळून 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यासाठी शासनाने परवानगी दिली. मग काय आहेर परिवाराने वर पक्षाशी बोलणे केले आणि लग्नाची तारीख 21 मे काढली.
आज (ता. 24 मे) मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा लग्नाचा सोहळा पार पडला. त्याला जोड मिळाली ती सोशल मीडियाची. 'मग येताय ना आमच्या फेसबुक लाईव्ह लग्नाला' असे म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून निमंत्रण देण्यात आली आणि आज दुपारी साडे बारा वाजता हा फेसबुक लाईव्ह लग्नसोहळा पार पडला. त्याला सोशल मीडियावर देखील तेवढीच उपस्थितीही मिळाली. अनेकांनी लाईव्ह शुभेच्छाचा वर्षाव करत नववधुवराला शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न
राजकीय घराण्यातील लग्नसोहळे फार मोठे असतात. आमच्याच घरातील लग्नाला 7 ते 8 हजार जण याआधी उपस्थित राहिले आहेत. तसेच कमी खर्चात देखील लग्न होऊ शकतात. तसेच मी माझ्या मतदारसंघात कायम नवनवीन उपक्रम राबवित असते. त्यामुळे आपणच कमी खर्चात लग्न करून एक वेगळा पायंडा पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे, असे वधु तथा नाशिक जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती आश्विनी आहेर यांनी सांगितलं. तसेच त्यांनी कोरोनामुळे शासनाने सुचवलेल्या सूचनांचे पालन करत लग्न केल्याचेही सांगितले.
हेही वाचा - नाशिक शहरातील दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचा शिरकाव, जिल्ह्यात शनिवारी आढळले 34 रुग्ण
हेही वाचा - नाशिक : मालेगावात रॅपिड अॅक्शन फोर्स दाखल, रमजान ईदची नमाज घरीच पठन करण्याचे आवाहन