नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू असून हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे एक वेळेच्या जेवणाचे हाल होत आहेत. हे बघून सामाजिक बांधिलकीतून कसबे सुकाने येथील युवा शेतकरी दत्ता पाटील यांनी आपल्या शेतातील एक एकर गव्हाचे गरजू नागरिकांना मोफत वाटप केले आहे. हा आदर्श देशभरातील सहन शेतकऱ्यांनी घेऊन गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन युवकाने केले आहे.
"माझ्याकडे एक कष्टकरी महिला आपल्या बाळाला घेऊन आली आणि दत्ता भाऊ तुमच्याकडे काही शीळपाकं अन्न असेल तर द्या, असं म्हणाली. तिला विचारले तर संचारबंदी असल्याने हाताला काम नाही म्हणून, पैसे कोठून आणणार? हे ऐकल्यावर मला रात्रभर या विचाराने मला झोप आली नाही. अशा गरजू व्यक्तींना मदत करावी, असा विचार मी माझ्या कुटुंबासमोर ठेवला आणि सर्वांनी एकमताने गरजूंना मदत करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे आम्ही आमच्या शेतात असलेला एक एकर गव्हाचे गोरगरीब मजुरांना वाटप केले. माझ्याप्रमाणे देशातील प्रत्येकाने जमेल, तशी गरिबांना मदत करावी अशी, म्हणजे देश पुढे जाईल."
- दत्ता रामराव पाटील
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले दत्ता पाटील यांचे कौतुक -
देशभरात कोरोना विषाणूचा प्रदूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कुठलाच गरीब, शेतकरी, मजूर, बेघर, विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी महाविकास आघाडी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. अशात शासनासोबत आपणही आपले कर्तव्य समजून सामाजिक भान ठेवत नाशिक जिल्ह्यातील युवा शेतकरी दत्ता पाटील यांनी निराधार व्यक्तींना आपल्या शेतातील गहू मोफत उपलब्ध करून देत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्याचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांनी दत्ता पाटील यांना दूरध्वनीवरून फोन करून त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.