नाशिक - नाशिक स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपचे सर्व 8 सदस्य सहलीसाठी काल संध्याकाळी उशिरा रवाना झाले. त्यामुळे, स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक रोमांचक परिस्थितीमध्ये पोहचली आहे.
हेही वाचा - महत्त्वाकांक्षी योजना गावठाणांची ड्रोनमार्फत मोजणी उपक्रमास सुरुवात
आक्रमक झालेल्या सेनेला रोखण्यासाठी, भाजपचा सावध पवित्रा
नाशिक महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या नव्याने आठ सदस्यांची बुधवारी विशेष महासभेत महापौर सतीश कुलकर्णी यांनी निवड केली. त्यानंतर राजकीय घडामोडी गतिमान झाल्या असून आता भाजपने कोणताही धोका न पत्करता आणि एकेकाळचा मित्र पक्ष, तसेच आताचे विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही राजकीय खेळीमध्ये आपले सदस्य अडकू नये, म्हणून सर्व सदस्यांना घेऊन भाजपचे नाशिक मधील नेते हे शेजारील गुजरात राज्यामध्ये गेले आहे.
भाजपची 2 मते फोडण्यासाठी सेना आणि राष्ट्रवादीच्या जोरदार हालचाली
भाजपच्या एका नेत्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रचारासाठी हे सदस्य गेले आहेत. परंतु, प्रत्यक्षात नाशिक महानगरपालिकेतील स्थायी समितीचे संख्याबळाचे गणित बघितले, तर या संख्याबळात भाजपच्या आठ सदस्यांपैकी 2 मते फोडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकमधील स्थानिक नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे, आपले सदस्य विरोधी पक्षाच्या गळाला लागू नये, तसेच भाजपला स्थायी समितीची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी मनसेचाही पाठिंबा हवा असल्याने त्या दृष्टिकोनातून या सगळ्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
मनसेचे 1 मत ठरणार निर्णायक
सध्याच्या घडीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीकडे सात सदस्य आहेत. तर, भाजपकडे आठ सदस्य आहेत. एक सदस्य मनसेचे सलीम शेख हे असून त्यांच्या मतावरती भाजप सत्तेची चावी मिळू पाहात आहे. परंतु, या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सांगली सारखी परिस्थिती नाशिकमध्ये होऊ नये म्हणून भाजपने बुधवारी निवडणूक झाल्यानंतर तत्काळ स्थानिक नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर स्थायी समितीचे सर्व सदस्य हे शेजारील गुजरात राज्यात सहलीसाठी पाठविण्याचा निर्णय घेऊन, हे सर्व सदस्य बुधवारी संध्याकाळी उशिरा गुजरातकडे रवाना झाले. त्यामुळे, आता स्थायी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक अधिक रोमांचक स्थितीमध्ये आली आहे.
हेही वाचा - वस्त्र मंत्रालयाच्या पुढाकाराने येवल्यात पैठणी विणकामाचे महिलांना मोफत प्रशिक्षण