नाशिक - कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी शासन स्तरावर जनजागृती केली जात आहे. मात्र, काहीजण लॉकडाऊनमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला, तर आपणच आपल्या मृत्यूला निमंत्रण देतो, हे पटवून देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील मनेगाव धोंडवीर नगरचे ग्रामविकास अधिकारी एम. बी. यादव यांनी चक्क यमराजाच्या भूमिकेत गावातील रस्त्यावर अनोख्या पद्धतीने जनजागृती करत आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, शहरासोबतच ग्रामीण भागातील काही नागरिक संचारबंदी नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहे. अत्यावश्यक कामाचे कारण देत घराबाहेर पडताना दिसून येत आहे. शासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र, तरी देखील नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोनाचा शिरकाव गावात होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभागाच्या वतीने पथनाट्याचा आधार घेत गावातील चौकाचौकात प्रबोधन करण्यात येत आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी एम. बी. यादव यांनी यमराज, आरोग्य सेवक प्रभाकर ढापसे यांनी चित्रगुप्त, तर ग्रामपंचायतीचे लिपिक भाऊसाहेब सोनवणे यांनी यमदूताची भूमिका साकारली.
गावातील चौकात जात या तिघांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. यावेळी प्रत्येकाला हात धुण्याचे महत्त्व, सोशल डिस्टन्सिंग याबाबत प्रबोधन करण्यात आले. गावकऱ्यांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करू, असा विश्वास व्यक्त केला. शासन स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी नागरिक याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही. कोरोनाचे संक्रमण वाढल्यास आपणचं आपल्या मृत्यूची दारे खुली करण्यास कारणीभूत ठरणार आहोत, हे पटवून देण्यासाठी तालुक्यातील मानेगाव गोगीर नगरचे ग्रामविकास अधिकारी यादव यांनी पटवून दिले.