नागपूर - रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेतून पडून जखमी झालेल्या युवकाला एक किलोमीटर पाठीवर नेत रुग्णालयात दाखल करत माणुसकीचे दर्शन घडवले. वेळेवर उपचार मिळाल्याने युवकाला जीवदान मिळाले आहे.
अनेकदा अपघात झाल्यावर जखमी व्यक्तींच्या मदतीला कोणी पुढे येत नाही. परिणामी वेळेवर उपचार मिळाले नाही तर त्या जखमी व्यक्तीच्या जीवावर बेतते. असेच काहीसे घोटी-अस्वली स्थानकादरम्यान घडले. पाडळी गावाजवळील एक युवक पुष्पक एक्सप्रेस मधून पडून गंभीर जखमी झाला होता. याच दरम्यान कनिष्ठ अभियंता सचिन आहेर, विठ्ठल दराडे, प्रमोद डांगे, विशाल वाजे, स्टेशन मास्तर सरोदे कर्डिले, रेल्वेच्या ट्रॉली मधून पाहणी करत असताना हा जखमी युवक बेशुध्द अवस्थेत पडलेला त्यांच्या निदर्शनास आला.
क्षणाचाही विलंब न लावता या रेल्वे कर्मचाऱ्यांनी कपड्याची झोळी करत जखमी युवकाला चिखल, पाण्याची डबकी असलेल्या भाताच्या शेतातून जवळपास एक किलोमीटर उचलून रस्त्यापर्यंत नेले. तेथून रुग्णवाहिकेस फोन करून तातडीने त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने या युवकाला जीवनदान मिळाले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.