नाशिक - शहरात आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नाशिक पोलीस सज्ज झाले आहेत. शहरात शस्र आणि परवाने जप्त करण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक शहरात एकूण १२५९ शस्त्र परवाने पोलिसांनी दिले आहेत. त्यात जवळपास २२५ जणांचे शस्त्र परवाने पोलिसांनी ताब्यात घेतले असून या कारवाईत राजकीय मंडळींची संख्या अधिक आहे. शिवाय शहरात विना परवाना शस्त्र बाळगताना पोलिसांना आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे दर शनिवार हा तक्रार निवारण दिन म्हणून पाळला जाणार आहे. वरिष्ठ अधिकारी थेट सर्वसामान्य माणसांना भेटणार आहेत. लोकांनी केलेल्या तक्रारीची स्थिती काय, त्यावर कोणती कारवाई झाली, जर झाली नसेल तर केव्हा होणार याची थेट माहिती करून दिली जाणार आहे. तसेच ३ महिन्याच्या आतच तक्रारीचा निपटारा होणार आहे. यानुसार ३ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तर उर्वरित व्यक्तींवर येथे काही दिवसात तडीपारीची कारवाई करण्यात येईल.
एवढेच नव्हे तर बेशिस्त वाहतूक चालकांवरही कठोर कारवाई होणार आहे. सोबतच जर लहान मुले दुचाकी चालवताना दिसल्यास त्यांच्या पाल्यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. बेशिस्त रिक्षा चालवणारे काही रिक्षाचालक हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असून त्यांच्यावरही आता कारवाई सुरु करणार असल्याचे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.