नाशिक - जिल्ह्यासह विविध शहरातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या दुचाकी टोळीतील २ संशयितांना गजाआड करत पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल २३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
शहरात मागील काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, पोलिसांना काही दुचाकी चोरांचा सुगावा लागत नव्हता. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस आणि शहरातील पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. शहरातील या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसावा आणि चोरटे लवकरात लवकर गजाआड झाले पाहिजे, या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी कंबर कसली होती.
त्यातच पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत २ दुचाकी चोर शहरातील गोल्फ क्लब भागात चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने कोणताही वेळ न दडवता तत्काळ संबंधित ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, गोल्फ भागात निळ्या रंगाच्या पल्सरवर दोन संशयित त्या ठिकाणी पोहोचल्याचे बघून खबऱ्याने पोलिसांना इशारा करताच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.
यावेळी त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी मनोहर ब्राह्मणे आणि संजय पवार अशी नावे सांगितले. मात्र, हे दोघेही इतर माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. परंतु, पोलिसांनी खाक्या दाखवताच या दोघांनाही आतापर्यंत केलेल्या चोरीचा पाढा वाचला. चोरीचा हा प्रताप ऐकूण पोलीसही थक्क झाले. या दोघांनी आतापर्यंत जवळपास विविध कंपनीच्या २३ मोटरसायकल चोरीची कबुली दिली. तसेच हे मोटरसायकल त्यांनी नाशिक, नगर, लातूर अशा विविध भागातून चोरी केल्याचे सांगितले.
दरम्यान, यामुळे नाशिक पोलिसांच्या हाती बाईक चोरांचे मोठे रॅकेट हाती लागले आहे. तसेच अजूनही काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.