नाशिक - उमेदवार मतदारांकडे मतांचा जोगवा मागताना दिसून येतात. पण नाशिकमध्ये श्री राम जन्मोत्सवनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ, शिवसेनेचे हेमंत गोडसे, तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे हे तिन्ही प्रमुख उमेदवार नाशिकच्या प्रसिद्ध श्री काळारामाच्या चरणी लीन झाल्याचे दिसत आहे. ही तिरंगी लढत होत असून, या निवडणुकीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदारसंघातील नागरिकांचे आयुष्य आरोग्य चांगले राहो, तसेच मी निवडून आल्यानंतर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे आयुष्य घालवेन, असे साकडे प्रभू रामांना घातले आहे. मला निवडून येण्यासाठी सुरभी रामचंद्रांनी आशीर्वाद दिला असल्याचे अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटेंनी सांगितले.
देश दुष्काळमुक्त व्हावा, बेरोजगार झालेल्या युवकांना काम मिळावे, आणि देश पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने जावे, असे साकडे भुजबळ यांनी प्रभू रामांना घातले, २०१४ मध्ये मतदारांनी विचार करून मतदान केले होते. यंदा मात्र विकासाला बघून मतदार विचार करेल, असा विश्वास असल्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ म्हणाले.
यंदाच्या वर्षी चांगलं पाऊस होवो आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळो, तसेच महाराष्ट्रातील महायुतीचे सर्व ४८ उमेदवार निवडून येऊन केंद्रात पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होवो, अशी प्रार्थना प्रभू रामाच्या चरणी केल्याचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे म्हणाले.