नाशिक - 'चहावाला या देशाचा पंतप्रधान बनू शकतो तर मी ग्रामपंचायत सदस्य का बनू शकत नाही', असे म्हणत आकाश पागेरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. अनेक वर्षापासून लोकांना चहाच्या दिलेल्या गोडव्यातून त्यांनी ग्रामपंचायतीचे रण देखील जिंकले आहे. बेलतगव्हाण ग्रामपंचायतीत मतांची डबल सेंच्युरी ठोकत ते सदस्य म्हणून निवडून आले. त्यामुळे सध्या गावात ते चर्चेचा विषय ठरले असून त्यांच्या टपरीवर चहाचा झुरका घेण्यासाठी गर्दी होत आहे.
चहा टपरीचा केला प्रचारासाठी वापर...
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचाराचा राज्यभरात धुराडा उडवला होता. घराघरापर्यंत ताई, माई, आक्का माझ्या नावावरच मारा विजयाचा शिक्का असा जोरदार प्रचार करत होते. मात्र, पुर्वी चहाची टपरी हाच सोशल मीडिया होता. या ठिकाणी गावातले लोक चहापिण्यासाठी जमायचे. चहा सोबत गप्पांचा फड रंगायचा व गावातली बित्तम बातमी येथे मिळायची. या फंडाच्या पागेरे यांनी पुरेपुर वापर केला आहे.. चहाच्या व्यवसायात असल्याने गावातील जनसंपर्क हा वाढत गेला व निवडणुकीत विजय झाला असल्याचे आकाश पागेरे यांनी सांगितले.