नाशिक - राजधानी दिल्ली ते नाशिक शहराला जोडणारी विमानसेवा सुरू करण्याला परवानगी मिळाली आहे. यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आला आहे. येत्या 20 नोव्हेंबरपासून नाशिकमधून राजधानी दिल्ली व मेट्रो सिटी हैदराबाद अशी विमानसेवा सुरू होणार आहे.
उद्योजकही करत होते मागणी -
उडान-2 योजनेअंतर्गत नाशिकमधून पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद या तीन शहरांमध्ये पोहोचण्यासाठी विमानसेवा सुरू आहे. मात्र, नाशिकमधून थेट राजधानी दिल्लीला जोडणारी विमान सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने उद्योजकांकडून करण्यात येत होती. उद्योजकांची ही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी सरकार दरबारी लावून धरली होती.
स्पाईस जेट कंपनी देणारी सेवा -
नाशिकमधून दिल्ली आणि हैदराबादसाठी हवाई वाहतुकीसाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार स्पाईस जेट ही विमान कंपनी नाशिकमधून दिल्ली व हैदराबाद अशी विमानसेवा देणार आहे. दिल्ली व हैदराबाद विमान सेवेमुळे नाशिकमधील उद्योग-व्यापाऱ्याला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. भविष्यात चेन्नई आणि बंगळुरूसाठी देखील हवाई सेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - नाशिक-दिल्ली विमानसेवेला ब्रेक; पर्यटन, उद्योगावर परिणाम
दरम्यान, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगसाठी स्लॉट उपलब्ध होत नसल्याने अनेकदा सुरू झालेली मुंबई विमानसेवा बंद करण्यात आली आहे. पुणे येथील लष्कराचे विमानतळ लँडिंगसाठी वापरले जात आहे. त्यासाठी संरक्षण विभागाकडून परवानगी मिळत नसल्याने मुंबई पाठोपाठ पुणे येथील हवाई सेवादेखील बंद ठेवण्यात आली होती. आता संरक्षण विभागाने पुन्हा विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणची हवाई वाहतूक सुरू करण्यात आली आहे. देशांतर्गत हवाई वाहतूक वाढल्यानंतर नाशिकच्या ओझर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा प्राप्त होण्यास मदत होईल.