नाशिक - देवळाली कॅम्प येथील सराईत गुन्हेगाराची पूर्ववैमन्यस्यातून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली आहे. याबाबत इगतपुरी पोलिसांनी पाच संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पाचही मारेकरी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
धमकी देऊन केली हत्या
देवळाली कॅम्प येथील सराईत गुन्हेगाराची पूर्ववैमन्यस्यातून धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी नाशिकच्या इगतपुरी भागात उघडकीस आली. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी पाच संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. देवळाली कॅम्प तसेच नाशिक परिसर गुन्हेगारीने हादरून सोडणाऱ्या संजय बबन धामणे या सराईत गुन्हेगाराची इगतपुरी शहरात हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत संजय धामणे याचा भाऊ राजू धामणे हा सहा वर्षांपूर्वी कल्याण येथे हत्या झालेल्या डेव्हिड पॅट्रीक मॅनवेल हत्येप्रकरणात तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला न्यायालयात आणले असताना संजय धामणे याच्या भाच्याला काही जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पाचही संशयित फरार
दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी संजय धामणे हा इगतपुरी जवळील अँबेसिडेर हॉटेलजवळ असलेल्या डाक बंगल्याजवळ जात असताना संशयित अजय पॅट्रीक मॅनवेल,सायमन उर्फ पापा पॅट्रीक मॅनवेल, अजय उर्फ टकल्या पवार, राजकुमार भारती आणि आशा पॅट्रीक मॅनवेल आदींनी धारदार हत्यारांची संजय धामने याची हत्या केली असल्याचे इगतपुरी पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान, हे पाचही संशयित फरार झाले असून इगतपुरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, सराईत गुन्हेगाराची अशाप्रकारे हत्या झाल्याने इगतपुरीसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.