नाशिक - येथे महापौर, उपमहापौर पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी फोडाफोडीचे राजकारण होऊ नये यासाठी खबदारी म्हणून आज अखेर नाशिकचे भाजप नगरसेवक सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना झाले. सध्या स्पष्ट बहुमत असले तरी भाजपला ही निवडणूक जड जाणार असे दिसत आहे.
हेही वाचा- काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिवसेना नेत्यांची राज्यपाल भेट लांबवणीवर
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी एक होऊन भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. म्हणून भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नाही. मात्र, अस असलं तरी सात नगरसेवकांनी वेगवेगळी कारणे देत सहलीला जाण्यास नकार दिल्याने भाजप गोटात खळबळ उडाली आहे. भाजपतून राष्ट्रवादी मार्गे शिवसेनेत गेलेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेल्या सात नगरसेवकांनी सहलीला दांडी मारली आहे. त्यामुळे हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
भाजपने या निवडणुकीची चांगलीच धास्ती घेतली आहे. राज्यात युतीचा मुख्यमंत्री होणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेत भाजपचे संख्याबळ जास्त असले तरी महापौरांच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी भाजपने नगरसेवकांची पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसते. मात्र, असे असलं तरी सात नगरसेवकांनी कारणे देत सहलीला जाण्यास नकार दिलानं हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचेही बोललं जात आहे. आज हे सर्व नगरसेवक सहलीला अज्ञात ठिकाणी जाणार होते. मात्र, ऐनवेळी हे ठिकाण बदलण्यात आलं. विशेष म्हणजे यंदा प्रथमच विधानसभा निहाय आमदारांना नगरसेवकांना एकत्र जमवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे शहराध्यक्ष गिरीश पालवे हे कार्यक्षम नाहीत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात दिसून आली. पूर्व विभागातून जवळपास सात नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नाशिक पूर्व मधील सर्व नगरसेवकांना अडगाव नाका भागात एकत्रित केले. या ठिकाणाहून पूनम धनगर, प्रियंका माने, कमलेश बोडके, विशाल संगमनेरे,अनिता सातभाई, सीमा ताजने, मच्छिंद्र सानप, हे नगरसेवक गैरहजर राहिले आहेत.
निवडणुकीवर राज्य सत्तांतराचा मोठा परिणाम होणार असल्याने, शिवसेनेनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महापौर निवडणुकीत भाजपचा एकही नगरसेवक फुटणार नाही, असा विश्वास भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी व्यक्त केला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत 61 ही मॅजिक फिगर असून, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि अपक्ष धरुन ही संख्या 55 पर्यंत पोहोचणार आहे. शिवसेनेला महापौरपद पाहिजे असल्यास महाशिवआघाडीला अवघ्या सहा मतांची गरज भासणार आहेत. त्यामुळे निवडणुकीवर गिरीश महाजन हे देखील विशेष लक्ष ठेवून आहेत. तरी नगरसेवकांची जुळवाजुळव करताना भाजप पदाधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होईल हे मात्र नक्की.