बागलाण (नाशिक) - नामपूर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच नामपूर परिसरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर हे रुग्णालयात सील करण्यात आले आले असून, येथील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, 1 एप्रिल ते 8 एप्रिलदरम्यान जे रुग्ण नामपूर रुग्णालयात तपासणी किंवा उपचारासाठी आले असतील त्यांनी आपली माहिती ग्रामपंचायत किंवा प्रशासनास कळवण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी के. बी. इंगळे यांनी केले आहे.
रुग्णालयात सेवेत असले वैद्यकीय अधिकारी मालेगाव येथून ये–जा करतात. त्यांना आणि त्यांच्या मालेगाव येथे वास्तव्यास असलेल्या पत्नीलाही करोनाची लागण झाल्याचा अहवाल मालेगाव सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला आहे. यानंतर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेले रुग्ण अथवा नातेवाईकांचे सर्व्हेक्षण करण्यात येऊन त्यांना तत्काळ होम-क्वारंटाईन करण्याचे काम शासन पातळीवर सुरू आहे.
नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेली माहिती गृहीत धरून सूचनांचे पालन करावे असे, आवाहन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केले आहे.