नाशिक - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC विरोधात राज्यभर आंदोलने सुरु आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले. नाशिकमध्येही मुस्लिम संघटनांनी एकत्र येत या कायद्याला विरोध दर्शवला आहे. आज मुस्लिम संघटनांनी गोल्फ क्लब मैदान येथे निषेध सभेचे आयोजन केले होते.
या कायद्यामुळे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होणार आहे. देशात पुन्हा एकदा अशांतता निर्माण होईल. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा त्वरित मागे घ्यावा, या मागणीसाठी सर्वच संघटनांचे पदाधिकारी हातात तिरंगा आणि निषेधाचे फलक घेऊन गोल्फ क्लब मैदानावर जमले होते. या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच या सभेत तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. या सभेत मोदी-शाहंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत कायदा मागे घ्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.