नाशिक - नांदगाव तालुक्यातील वाखारी हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीच्या उद्देशातून हे हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे. एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये काही अज्ञातांनी नांदगाव तालुक्यातील वाखारी या ठिकाणी राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घुणपणे हत्या केली होती. या हत्येने परिसरात खळबळ उडाली होती. आरोपींनी कोणताही पुरावा मागे न सोडल्याने, या प्रकरणाचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या उद्देशाने तिघांनी एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
तीन जणांना अटक
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी धर्मा चव्हाण, सचिन भोसले आणि संदीप चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून, मौजमजा करण्यासाठी ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरामध्ये चोरी करत असल्याची त्यांनी कबुली दिली आहे. दरम्यान त्यांनी चोरीच्या उद्देशातून या चौघांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नांदगाव परिसरातील वाखारी- जेउर रोडला आण्णा पुंजाराम चव्हाण यांचे घर आहे. ते घरासमोर ओट्यावर झोपले होते. तर त्यांचा मुलगा समाधान चव्हाण (वय 35) सुन भारती चव्हाण (वय 26) नात आराध्या चव्हाण (वय 07) तसेच नातू अनिरूध्द चव्हाण (वय 05) हे सर्व घरात झोपले होते. दरम्यान याचवेळी चोरीच्या उद्देशाने आलेल्या या आरोपींनी त्यांची हत्या केली. या प्रकरणी अज्ञात आरोपीच्याविरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून, या तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी चोरीच्या उद्देशाने हे हत्याकांड केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - नागपुरात दुकाने बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा विरोध; शासनाच्या निर्बंधांचा निषेध