नाशिक- पुनंद धरणाच्या पाणी प्रश्नावरून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची बैठक पार पडली. धरणावरच आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत ठेगोडा पाझर तलावाला पाईपलाईने पाणी नेण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला. तसेच पुनंद धरणाच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी वेळप्रसंगी सरकार विरोधात लढाई करून जलवाहिनी योजनेला विरोध केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण भूमिका यावेळी घेण्यात आली.
या बैठकीत खासदार डॉ. भारती पवार, आमदार जे. पी. गावित, जि. प. सदस्य नितीन पवार, जलवाहिनी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार तसेच कळवण, सटाणा, देवळा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारती पवार म्हणाल्या की, सटाणा शहरासाठी कमी खर्चात देण्याचा पर्याय उपलब्ध असताना ५५ कोटी रुपये खर्च करण्याचा अट्टाहास कशासाठी केला जात आहे? सटाणा शहराला पाण्याची गरज आहे. पाईपलाईने पाणी नेण्यासाठी अट्टाहास सोडला तर लवकरच सटाणा शहराचा पाणी प्रश्न मिटनार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुनंद प्रकल्पावर अभोणा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबद्दल जि. प. सदस्य नितीन पवार यांनी आक्षेप घेतला. जलवाहिनी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष देविदास पवार यांनी उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगून न्यायालयीन प्रक्रिया संदर्भातील खर्च जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शैलेश पवार करणार असल्याचे सांगितले.
कळवण तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय पदाधिकारी, संघर्ष समितीचे पदाधिकारी व खासदार डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. भारती पवार, आमदार राहुल आहेर, आमदार दीपक चव्हाण, सटाणाचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांच्याकडे संयुक्त बैठक घेऊन याप्रश्नी चर्चा करण्यात येणार आहे. सोमवारी होणऱया बैठकीकडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागून आहे.