नाशिक - जिल्ह्यातील दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी नाशिकच्या जिल्हा परिषदेत मंगळवारी सायंकाळपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. तालुक्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कामांच्या फाईल जिल्हा परिषदेतून गहाळ झाल्याने झिरवाळ आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केले.
मी आदिवासी आमदार आहे. त्यामुळे माझी कामे होत नाहीत. विभागीय अधिकारी कंत्राटदारांच्या सांगण्यावरून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत आदिवासींवर अन्याय करत असल्याची भावना आमदार झिरवाळ यांनी व्यक्त केली. जोपर्यंत माझं काम होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
हेही वाचा - तब्बल बारा वर्षांनंतर गिरणा धरण शंभर टक्के भरले
दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील सिमेंट बंधारे तसेच पाणीपुरवठा योजनांच्या कामांबाबत आमदार झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाकडे सोमवारी फाईल्सची मागणी केली होती. त्यावेळी त्यांना चुकीची माहिती सांगण्यात आली. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते मंगळवारी पुन्हा जिल्हा परिषदेत गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी वेगळीच माहिती सांगितली.
सकाळपासून जिल्हा परिषदेत आलेले झिरवाळ यांची सायंकाळी ७ वाजता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी भेट झाली. तेव्हा त्यांनी हा प्रकार त्यांच्याकडे मांडला. यावेळी त्यांनी वित्त विभागाला फाईल्स झिरवाळ यांना दाखविण्याचेही सांगितले. त्यावेळी वित्त अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांनी काही वेळाने झिरवाळ यांना भेटून फाईल सापडत नसल्याचे कारण सांगून कार्यालय बंद करून घेतले. अधिकारी दाद देत नसल्याचे पाहून झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेतच रात्रभर ठिय्या आंदोलन केले.