नांदगाव (नाशिक) - राज्यातील काही भागात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. नाशिक जिल्ह्यातील काही गावांना गारपीटीचा सर्वाधिक फटका बसला. कांदा, भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी या अवकाळी पावसामुळे पुरता हवालदिल झाला आहे. याच अवकाळी पाऊस व गारपीट झालेल्या भागांची आमदार सुहास कांदे यांनी पाहणी केली. राज्य शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत बळीराजाला धीर देत सरसकट पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे नांदगाव तालुक्यातील आमोदे, बोराळे, कळमदरी, मळगाव, वेहेळगाव, मंगळणे इत्यादी गावांमध्ये मका, कांदा, डाळिंब, केळी, शेवगा आदी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या गावांना आमदार सुहास कांदे यांनी महसुल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
शेती पिकांचे झालेले नुकसान सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करण्याबाबत तहसिलदार व कृषी अधिकारी यांना आदेश दिले. शेतकऱ्यांना या नुकसानीतून सावरण्यासाठी शासनस्तरावर आम्ही प्रयत्नशील असून ही सर्व परिस्थिती शासनाच्याही निदर्शनास आणून देत असल्याचे यावेळी कांदे यांनी सांगितले. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी गोकुळ आहिरे, नायब तहसिलदार मर्कंड, मंडळ अधिकारी डूमरे, मंडळ अधिकारी नरोटे, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, नुकसानग्रस्त शेतकरी, आमोदे सरपंच विठ्ठल पगार, बोराळे सरपंच राजेंद्र पवार, कळमदरी सरपंच मनोज पगार, मळगाव उपसरपंच नितीन आहेर तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
नांदगाव तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका -
नांदगाव तालुक्यातील आमोदे, बोराळे, कळमदरी, मळगाव, वेहेळगाव, मंगळणे इत्यादी गावासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. या अवकाळी पावसामुळे, कांदा, डाळिंब, केळी, शेवगा आदी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा - मेळघाटात पारंपरिक होळी सणाला प्रारंभ