नाशिक - महाराष्ट्रात सत्ता नाट्य रंगात आले असताना गेले तीन दिवस बेपत्ता असलेले राष्ट्रवादीचे दिंडोरी-पेठ मतदार संघाचे आमदार नरहरी सिताराम झिरवाळ लोकांसमोर आले आहेत. आज (25नोव्हेंबर) सकाळी आमदार झिरवाळ यांनी एका व्हिडिओद्वारे आपण शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केले आहे.
या व्हिडिओत झिरवाळ म्हणाले आहेत की, "पवारसाहेबांनी माझ्यावर आतोनात प्रेम केले आहे. मी कधीही साहेबांना सोडून जाण्याचा विचार करू शकत नाही. माझी छाती फाडली तरी शरद पवार साहेब दिसतील. जशी संत चोखाबांची समाधी खोलल्यावर त्यांची हाडे विठ्ठल-विठ्ठल बोलत होती. तशीच माझी हाडे सुध्दा पवार साहेब बोलतील"
हेही वाचा - विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सर्व स्पष्ट होईल - शरद पवार
गेले तीन दिवस झिरवाळ गायब असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय काल वणी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करायला गेले होते. परंतू, जिथे शेवटचे लोकेशन भेटेल तिथे तक्रार दाखल करण्याचा सल्ला पोलीस आधीकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांची मुले गोकुळ आणि दिपक यांनी मुंबईत जाऊन वडीलांचा तपास सुरू केला होता. काल रात्रीपर्यंत झिरवाळ यांची कहीच माहिती मिळाली नव्हती. त्यांनंतर, आज सकाळी झिरवाळ यांचा हा व्हीडीओ समोर आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.