नाशिक - निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम असा अखंड हरिनामाचा गजर करत वारकरी त्रंबकच्या दिशेने रवाना होत आहेत. निमित्त आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेचे. हातात भगवी पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, पालखीचा सहभाग आणि त्यासोबत असलेले भालदार, चोपदार, नाशिकच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत.
त्यामुळे टाळ मृदुंगाच्या गजरासह अखंड हरिनामाचा जप आणि भाजनांनी नाशिक शहर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. अनेक दिंड्या नाशिकच्या राम मंदिरात दर्शनासाठी थांबा घेतलाय तर अनेकांनी मुक्काम देखील केलाय. नाशिककरांकडून ठिकठिकाणी या दिड्यांचे स्वागत केलं जात आहे. त्यामुळे नाशिक शहरात वारकऱ्यांचा मेळाच भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.