नाशिक - आपल्या मुत्सद्देगिरीमुळे वेगवेगळ्या पक्षातील दिग्गजांना भारतीय जनता पार्टीत दाखल करून घेत पक्षाची ताकद वाढवणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर नाशिकमधील भाजपच्या बंडखोरांना रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी आज भाजपकडूनच उमेदवारी अर्ज सादर केल्याने महाजनांसमोर कोकाटे यांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
कोकाटे यांनी निवडणुकीतून माघार न घेतल्यास युतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षांच्या इच्छूकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचे हत्यार उपसले. नाशिक मध्ये देखील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा उभारत उमेदवारी दाखल केली होती.
नाशिकची जागा शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना सुटल्यानंतरही कोकाटे यांनी आपली बंडाची तलवार मान्य केली नाही. त्यामुळे भाजपा बरोबरच युतीच्या अधिकृत उमेदवारासमोरही हे मोठे आव्हान मानले जात आहे. आज माणिकराव कोकाटे यांनी भाजप उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षश्रेष्ठींनी अजूनही मला उमेदवारी देण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे.
सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या कोकाटे यांच्या या भूमिकेनंतर नाशिकमधील भाजप पदाधिकारी देखील संभ्रमात पडले आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेला जागा सुटलेली असताना कोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने युतीच्या पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, कोकाटे माघार घेतील आणि युतीच्या उमेदवाराला मदत करतील, असा दावा भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केला आहे.
नाशिक लोकसभेसाठी माणिकराव कोकाटे हे भाजपकडून निवडणूक लढवू इच्छित होते. त्यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी लोकसभेची तयारी देखील सुरू केली होती. मात्र, ऐनवेळी शिवसेनेसोबत युती झाली, आणि कोकाटे यांची दावेदारी मोडीत निघाली. त्यामुळे त्यांनी पक्षालाच आव्हान देत बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.