नाशिक (मालेगाव) - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावच्या मशिदीतील मौलानांना कोरोना विषयी जनजागृती करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. कोरोना विषाणूबाबतीत काळजी घेण्यासंदर्भात शहरातील मौलाना आणि कुलजमाती तनजीमच्या प्रमुख मौलानांशी अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी चर्चा केली.
घुगे यांनी कशा पद्धतीने खबरदारी घ्यावी याविषयी मौलाना यांना मार्गदर्शन केले. त्यावर सहकार्य करण्याचे आश्वासन मौलानांनी दिले. मात्र, मशिदीमध्ये नमाज करू नका किंवा मशिदीमध्ये गर्दी करू नका याविषयी अपर पोलीस अधीक्षक काहीही बोलले नाहीत, अशी चर्चा परिसरात होती. शिवाय मौलाना यांनी सुध्दा त्याविषयी बोलण्याचे टाळले. देशात गंभीर परिस्थिती असताना शहरातील 300 हून अधिक मशिदींचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - CORONA : येवल्यात कोरोना विषाणूची अफवा पसरवणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल
राज्यातील सर्व मंदिरे आणि देवस्थाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. यात मशीदी आणि दर्ग्यांचासुद्धा समावेश आहे. मालेगाव शहरात सुमारे 300 मशिदी आहेत, त्या ठिकाणी गर्दी करू नये अशा सूचना असल्या तरी त्याचे पालन होताना दिसत नाही.