मालेगाव(नाशिक)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामात दिरंगाई व दांडी मारत कर्तव्यात कसूर करणाऱ्या १४ कर्मचाऱ्यांवर मालेगाव महापालिका आयुक्त दीपक कासार यांनी कठोर कारवाई केली आहे. या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 जणांमध्ये तीन डॉक्टरांचा देखील समावेश आहे. कासार यांनी यापूर्वीदेखील ३३ जणांविरोधात कारवाई केली होती. मालेगाव शहरात कोरोनाबाधितांची संख्या वर ५५३ गेली आहे.
महापालिका आयुक्त किशोर बोरडे यांनी वैद्यकीय रजा घेतल्यानंतर त्यांच्या जागेवर अमरावतीचे प्रशासन अधिकारी दीपक कासार यांची तातडीने बदली करण्यात आली होती. कासार यांनी आपल्या पदाची सुत्रे हाती घेताच धडक कारवाईला सुरुवात केली आहे. कासार यांनी कामावर गैरहजर राहिल्यामुळे ३३ कर्मचाऱ्यांविरोधात २ मे रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा १४ कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमणूक दिलेल्या ठिकाणी हे कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्यामुळे आयुक्त कासार यांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये 6 कायम तर 8 मानधनावरील कर्मचारी यांचा समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही कामावर गैरहजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मालेगावकरांनी आयुक्तांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. या कारवाईमुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आतापर्यंत ४७ कामचुकार कर्मचाऱ्यांवर मालेगाव शहरातील किल्ला पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देत १८८ अन्वये कर्मचाऱ्यांविरोधात आयुक्त कासार यांनी गुन्हे दाखल केले आहेत.
यांच्याविरोधात झाले गुन्हे दाखल..
- डॉक्टर-३
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ- १
- मिश्रक-२
- मानधन तत्त्वावरील सहायक कनिष्ठअभियंता-४
- लिपीक-२
- शिपाई- १
- संगणक चालक- १