नाशिक - देशभरात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर कर्मचारी २ तारखेपासून संपावर आहेत. समान वेतन कायदा लागू करावा व इतर मागण्यांसाठी १२० हून अधिक कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, याचा महाशिवरात्री उत्सवावर अधिक काही परिणाम दिसून आलेला नाही.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. आज दिवसभर मंदिर गाभाऱ्यात ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांची पूजा करण्यात येणार आहे. तसेच निश्चित काळात भगवान शंकराची महापूजा केली जाते. शिवलिंगावर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेकही करण्यात येतो.
सकाळ पासूनच मंदिरात दर्शन करण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. आज देशभरातून हजारो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच भाविकांच्या सेवेसाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वरसाठी एस टी महामंडळाच्या जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. एकूणच त्र्यंबकेश्वर नगरी 'बम बम भोले'च्या गजराने दुमदुमून गेली आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिर कर्मचारी २ तारखेपासून संपावर आहेत. समान वेतन कायदा लागू करावा व इतर मागण्यांसाठी १२० हून अधिक कर्मचारी संपावर गेले आहेत. महाशिवरात्री निमित्त देशभरातून आलेल्या भविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि स्वयंसेवक पुढे आले असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.