नाशिक -कोरोनामुळे दिंडोरी शहरासह ग्रामीण भागात प्रत्येक घरात तांब्याच्या घागरी भरून अक्षय्य तृतीया सन साजरा केला गेला. हिंदू दिनदर्शिकेतील वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी अनेक महत्त्वाची कामे शेतकरी करत असतात. यावर्षी यादिवशी सर्वांनीच कोरोना विषाणूचा नायनाट व्हावा यासाठी मागणे मागितले.
कोरोनामुळे दिंडोरी शहरासह तालुक्यात कुंभार व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदीमुळे अक्षय्य तृतीयेसाठी तयार करुन ठेवलेली मडकी, थंड पाण्याच्या माठांची विक्री झाली नाही. दुसरीकडे ग्राहकदेखील मडकी आणि माठ खरेदीसाठी येत नसल्याने कुंभार व्यावसायिक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी लॉकडाऊन असल्यामुळे घरातीलच तांब्याच्या घागरी भरून अक्षय तृतीया सन साजरा केला.
दरवर्षी अक्षय्य तृतीया दिवशी कुंभाराने बनवलेल्या मातीच्या घड्याला मान असतो. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे नागरिकांनी बाजारातील माठ खरेदीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे, माठ बनवणाऱ्या कुंभारांची निराशा झाली आहे .