येवला ( नाशिक) - कोरोनाच्या संसर्गामुळे देशासह राज्यात सर्वत्र टाळेबंदी झाल्याने अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे नोकरी गेल्याने अनेक जणांची आर्थिक कोंडी झाली. या काळात येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील धामणगाव येथील महेश शिवाजी गवळी या तरुणावरही तशीच वेळ आली. पण नोकरी गेल्याने खचून न जाता परिस्थितीवर मात करत एलईडी बल्ब बनवण्याचा छोटा उद्योग सुरू केला आहे. तसेच गावातील मित्रांनाही यात सहभागी करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
साठवलेल्या पैशातून एलईडी बल्ब बनवण्याचा छोटा उद्योग घरातच सुरू केला आहे. त्यासाठी लागणारे रॉ मटेरियल विकत आणून त्यांने कामाला सुरुवात केली. तयार केलेले बल्ब विकण्यासाठी मित्रांसह ग्रामीण भागात मार्केटिंग देखील सुरू केले आहे. अल्पदरात चांगले आणि टिकाऊ बल्ब मिळत असल्याने ग्रामीण भागात त्याला चांगली मागणी येत आहेत.
सद्यस्थितीला महेश दररोज 200 पेक्षा जास्त बल्ब तयार करत आहे. कुठला तरी उद्योग सुरू करण्यापेक्षा तो ठराविक काळासाठी नसावा, हे लक्षात घेऊन दैनंदिन वापरात असलेल्या बल्ब उद्योग सुरू केल्याचे त्याने सांगितले.