नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी जारी केलेल्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 आहे. अद्यावत आकडेवारीनुसार कोरोना बाधित नमुने पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण केवळ 6.48 टक्के असून या तुलनेत निगेटिव्ह नमुन्याचे प्रमाण सर्वाधिक 71.22 टक्के, तर 22.30 टक्के सॅम्पल प्रलंबित आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बहुतांश ठिकाणी प्रशासनाला मदत मिळत असल्याचे या टक्केवारी वरून दिसून येत आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल असलेले 235, मनपा रुग्णालयातील 230, मालेगाव मनपा रुग्णालयातील 171, शासकीय रुग्णालयातील मालेगाव 102 अशा 738 रुग्णांचे 740 नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 527 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यापैकी 442 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात संशयित परंतु ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आहेत, अशा रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. यामुळे लॉकडाऊन काळात नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यात मदत होईल.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या -
नाशिक शहर - ५५
नाशिक तालुका - ०५
मालेगाव - ४७
दरम्यान, एका कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज दिला असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.