नाशिक - तीन तासांच्या थरारानंतर गंगापूर रोड परिसरातील स्वामी विवेकानंद मार्ग येथील चाणक्य अपार्टमेंटमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. बिबट्या कैद झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद
आज सकाळी शहरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. भाजप खासदार भारती पवार यांच्या गंगापूर रोडवरील आनंद नगर बंगल्याजवळ बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद झाला होता. बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्या दिसल्याचे कळताच वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बिबट्याचा मागोवा घेतल्यानंतर तीन तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर बिबट्याला जेरबंद करण्यास पथकाला यश आले व सर्वांच्या जिवात जीव परतला.
हेही वाचा - धरणावर मित्राचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात, वालदेवी धरणात बुडून 6 जणांचा मृत्यू
वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या दोन पथकांनी हे कार्य केले. बिबट्यास दार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केल्याने रेस्क्यू ऑपरेशन करण्यास अडचणी येत होत्या.
हेही वाचा - नाशिक शहरात मृत्यू संख्या वाढली; जमिनीवरच होताहेत अंत्यसंस्कार