नाशिक : देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभाग, पोलीस आणि ग्रामस्थांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप सुटका करण्यात आली. तर, बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाल्याने नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
बिबट्या भक्ष्याच्या शोधात फिरताना पडला विहिरीत
देवळाच्या लोहोणेर येथील डोन शिवारातील कमलाकर नेरकर यांच्या घराजवळील विहिरीत बिबट्या पडला होता. भक्ष्याच्या शोधार्थ तो फिरत अताना विहिरीत पडल्याचे बोलले जात आहे. ही घटना निदर्शनास येताच तातडीने वनविभागाला कळवण्यात आले. वनविभागाचे पथक येईपर्यंत बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
बिबट्याला सोडले जंगलात
वनविभागाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बिबट्याला बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले. वन विभाग, पोलीस आणि ग्रामस्थांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नांनी बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात बिबट्याला सुखरूप सोडण्यात आले.
हेही वाचा - हिंगणघाटमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण; चौघांना अटक