नाशिक - निफाड तालुक्यातील सुंदरपूर येथील शिवारात एक मादी बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. या बिबट्याला सुखरुप विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे. दरम्यान, त्याला पिंजर्यात कैद करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
निफाड येथील सुंदरपूर शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास १ वर्षाची मादी बिबट रावसाहेब सोनवणे यांच्या शेतातील विहिरीत पडली. ही बाब दुपारी काहींच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. पोलीस पाटील यांनी वनविभागाला कळविले. माहिती मिळताच वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी वनरक्षक विजय टेकणार वनसेवक भैय्या शेख वनमजूर घटनास्थळी दाखल झाले. सदर विहिरीची पाहणी करून विहिरीमध्ये पिंजरा सोडण्यात आला आणि मादी बिबट्याला सुखरूप पिंजर्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.
हेही वाचा - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात नाशिकमध्ये निषेध सभा
या बिबट्याला निफाड येथे वनविभागाच्या रोपवाटिकेत ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची तपासणी करण्यात आली. या मादी बिबट्याला कोणतीही दुखापत नसल्याने पुन्हा तिला परत जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांनी सांगितले.
हेही वाचा - VIDEO : जेसीबीने पाईपलाईन तोडल्याने उडाल्या पाण्याच्या उंच कारंज्या; लाखो लिटर पाणी वाया