नाशिक - सातपूर येथे भाजपाचे मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाली होती. युनियनच्या वर्चस्व वादातून ही हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी संशयित असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांस अटक देखील करण्यात आली आहे. भाजपचा पदाधिकारी असलेल्या अमोल इघे यांच्या घरी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांत्वनपर भेट दिली. या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव असून अधिवेशनात अमोलची हत्या आणि नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीबाबत भाजप आवाज उठवणार असल्याची माहिती दरेकर यांनी आहे.
दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात अशा खुलेआम हत्या होत आहेत आणि महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. नाशिकमध्ये तर हत्यासत्र सुरू आहे. येथील पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे. अमोलच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊ नये, असे काही मंडळी दबाब टाकत असल्याचे आम्हाला समजले आहे. यामागे कोण आहे हे लवकरच कळेल, परंतु कुटूबीयांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे.असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.
देशात महाराष्ट्र गुन्हेगारीबाबत दुसऱ्या नंबरवर -
संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हा गुन्हेगारीबाबत दोन नंबरचे राज्य आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी करत मागील दोन वर्षे या सरकारने काहीही केले नाही. त्यामुळे राज्याची पीछेहाट झाल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.