नाशिक: शहरातील सिडकोतील सावता नगर भागातून शुक्रवारी रात्री उशिरा सहा ते सात समाजकंटक दोन दुचाकीवर बसून हातात कोयते घेऊन रायगड चौक, पवननगर भागात पोहोचले. यानंतर त्यांनी रस्त्यालगत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 3 कार, 2 रिक्षा तसेच 15 ते 20 दुचाकीच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक प्रचंड घाबरले.
सीसीटीव्हीच्या आधारे गुंडांचा शोध : माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेखसह अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. दरम्यान, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक रहिवाशी दहशतीखाली आहेत. यावर अंकूश लावण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक अंबड पोलीस ठाण्यात करावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
सिडकोत गँगची दहशत : सिडको परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच राहिला नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी दिल्या. गुंडांना राजकीय पाठबळ असल्याचे देखील नागरिकांचे म्हणणे आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी आता सिडकोत जातीने लक्ष घालून या गुंडांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सिडकोत पुन्हा एकदा विविध गॅंग तयार होत आहे. वर्चस्ववादातून असे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
पुण्यात कोयता गॅंगची दहशत: चार ते पाच जणांच्या टोळक्याने पुण्यातील मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातात कोयते घेऊन प्रचंड दहशत माजवली. हा संपूर्ण प्रकार पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील संत निरंकारी सत्संग भवनच्या समोर 24 मे च्या मध्यरात्री घडला आहे. कोयता गँगकडून मार्केट यार्ड येथे क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना धमकावत त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी अंकित भैरू प्रसाद सैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: