नाशिक - लासलगाव बाजार समितीमध्ये इजिप्तच्या काळपट लालसर कांद्याला जास्तीतजास्त ३ हजार ६३६ रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मात्र, भारतीय कांद्याला देशात आणि इतर देशात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने लाल कांद्याचे नुकसान झाले. त्यातच उन्हाळ्यात साठवून ठेवलेला कांदा संपत आला. यामुळे कांद्याची आवक मंदावली. मात्र, मागणी वाढली असताना त्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नव्हता. कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशात कांदा पुरेसा उपलब्ध व्हावा यासाठी व्यापाऱ्यांना कांदा आयात करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार लासलगाव येथील एका व्यापाऱ्यानी इजिप्त येथून कांदा आयात केला होता. तो कांदा देशांतर्गत मागणीनुसार पुरवठा केला. मात्र, पाहिजे त्याप्रमाणात मागणी नसल्याने त्यातील शिल्लक राहिलेला 30 क्विंटल कांदा त्या व्यापाऱ्याने लासलगाव बाजार समितीत दोन वाहनातून विक्रीसाठी आणला होता. त्यातील एका वाहनाताली कांद्याला 3 हजार 636 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला, तर दुसऱ्या वाहनातील कांद्याला 3 हजार 590 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव मिळाला. मात्र, भारतात व इतर देशात चवीसाठी भारतीय कांद्यालाच जास्त मागणी आहे.