नाशिक - राज्यात गुटखा बंदी असताना गुजरात येथून औरंगाबादच्या दिशेने नेण्यात येणारा बेकायदेशीर गुटखा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत ९६ लाख ४८ हजार रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी दोन आरोपींवर सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर राज्यात बेकायदेशीर गुटखा वाहतूक व विक्री करण्यात येत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्या अनुषंगाने सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चितेगाव फाटा जवळील स्पीड ब्रेकर जवळ सापळा लावण्यात आला. नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरून औरंगाबादच्या दिशेने निघालेल्या एका उत्तर प्रदेशच्या (यूपी 21 बीएन 6275) कंटेनरची पोलिसांनी तपासणी केली.
पोलिसांना त्या कंटेनरमध्ये ३६० पोत्यांमध्ये बेकायदा सुगंधी पानमसाला व सुगंधी तंबाखू असा गुटख्याचा अवैध साठा आढळून आला आला. तेव्हा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत कंटेनर आणि गुटखा असे मिळून १ कोटी ६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या अवैध गुटखा वाहतूक प्रकरणी शमसूद इस्लाम दिलशाद इस्लाम (रा. मोहमंद ता. बिलारी जि. मुरदाबाद) तसेच उमेश जगदिश सिंग यादव (रा. नगला नस्सु ता. बिलली, जि. मुरदाबाद) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना निफाड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.