नाशिक : भारतीय वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी 40 जातीची संपूर्णतः भारतीय बनावटीची विशेष प्रशिक्षण विमाने तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे एचएएलमधील 3 हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे. तर स्थानिक वेंडर्ससह इतर उद्योगांना व्यवसाय मिळणार आहे.
खासदार गोडसे एचएएल कंपनी प्रोजेक्टसाठी प्रयत्नशील : ओझर एचएएलमध्ये आतापर्यंत विविध प्रकारच्या विमानांची निर्मिती करण्यात आली आहे. येथील कारखान्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. विविध प्रकारची यशस्वी विमाने तयार करण्यात एचएएल प्रशासनाचा मोठा हातखंडा आहे. परंतु, गेल्या काही वर्षापासून एचएएलकडे कामाचा ओघ काहीसा कमी झाला होता. यातूनच विमाने तयार करण्याचे वाढीव काम एचएएल कंपनीला मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील होते. काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या पथकाने दिल्ली येथे संरक्षण विभागाचे सेक्रेटरी अजय कुमार यांची भेट घेतली होती. ओझर एचएएलला विमान निर्मितीची ऑर्डर देण्याचे साकडे घातले होते.
अनेक जातींच्या लढाऊ विमानांची निर्मिती : नाशिकच्या ओझरच्या एचएएलमध्ये आजपर्यंत अनेक जातींच्या लढाऊ विमानांची निर्मिती झाली आहे. या कारखान्यात 3 हजार अधिकारी, कर्मचारी आहेत. विविध जातींची लढाऊ विमाने तयार करण्यात येथील प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे कामाचा ओघ काहीसा कमी आहे. त्यामुळे विमाने तयार करण्याचे वाढीव काम प्रकल्पाला मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते.
भारतीय बनावटीच्या विमानाचा ताशी वेग 400 किमी : येथील कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सेक्रेटरी संजय कुटे आदींनी संरक्षण विभागाचे सेक्रेटरी अजय कुमार यांची भेट घेत काम देण्यासाठी साकडे घातले होते. त्यामुळे आता एचएलला एचटीटी 40 विमाने बनवण्याचे काम मिळाले असून, तब्बल 6 हजार 800 कोटींचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे. एचटीटी 40 विमान हे संपूर्णतः भारतीय बनावटीच्या विमानाचा ताशी वेग 400 किलोमीटर असून, हे विमान एकावेळी तीन तास उड्डाण करू शकते. 170 विमानांपैकी 100 बंगळुरूला, तर उर्वरित 60 विमानांची निर्मिती ओझर येथील एचएएलमध्ये होणार आहे.
उद्योगाला चालना मिळणार : नाशिकला मोठे उद्योग यावेत, यासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असताना, मिळालेले हे मोठे काम नक्कीच दिलासा देणारे आहे. ज्या उद्योगांची नोंदणी दोन वर्षांत एचएएलमध्ये झाली आहे. त्यांना मोठा फायदा होणार असून, संपूर्ण शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, अशी माहिती उद्योजकांनी दिली.