नाशिक - जिल्ह्यातील मुल्हेर येथील श्री उद्धवमहाराज समाधी संस्थानात हजारो वर्षांची परंपरा असलेला व वृंदावन मथुरेनंतर त्याच पद्धतीने रासक्रीडा साजरा केला जातो. हा ऐतिहासिक उत्सव रविवारी अश्विन शुद्ध पौर्णिमा दिवशी साजरा होतो.
हेही वाचा - सरकारच्या नाकर्तेपणाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाईन - डॉ. विश्वास झाडे
इ. स. पूर्व ३००० साली महाभारत कालीन राजा मयुरध्वजास भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य चक्षूंनी रासक्रीडेचे दर्शन घडवले. तेव्हापासून मुल्हेर येथे अश्विन पौर्णिमेस रासक्रीडा उत्सव साजरा केला जातो. असे इथले लोक म्हणतात. श्री उद्धवमहाराजांचे गुरू श्री काशीराजमहाराज यांनी १६४० साली या रासक्रीडेची पुनर्रचना केली असे पुरावे श्री उद्धवमहाराज संस्थानचे ११ वे मठाधिपती डॉ. रघुराज महाराज यांच्या अभ्यासाने सापडले आहेत. यावरून तेव्हापासून आजतागायत अविश्रांत हा रासक्रीडा उत्सव मुल्हेर येथे सुरु आहे.
रासक्रीडेची रचना -
रासक्रीडा उत्सव हा आजही उत्तर भारतीय पद्धतीने साजरा केला जातो. श्री उद्धव महाराजांच्या समाधीसमोर एक रासमंडल तयार करून त्यात १४ फुट व्यास असलेले चक्र बांधून २८ फुटाचे तयार केले जाते. त्यास दोरीने गुंफून त्यावर केळीची पाने झाकून रासक्रीडेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी (संपात काळात) ज्यावेळी चंद्र व सूर्य दोघेही क्षितिजावर असतांना हे चक्र समाधी समोरील रास स्तंभावर उपस्थित भाविकांच्या हस्ते श्री उद्धवमहाराज की जय या जयघोषात चढविले जाईल. त्यानंतर त्या चक्राला झेंडूच्या फुलांनी पूर्णपणे सजविले जाईल.
रात्री ८ वाजता देवघरापासून श्रीकृष्ण, राधा व गोपिका यांची सवाद्य मिरवणूक राधा कृष्ण जय कुंजविहारी, मुरलिधर गोवर्धनधारी या भजनाच्या जयघोषाने समधीपर्यंत निघेल. तेथे रासमंडलाखाली राधा, कृष्ण व गोपिकांना बसवून मग रासक्रीडेच्या भजनांना सुरवात होईल. विशेष बाब म्हणजे ज्यांना मुलबाळ होत नाही असे भाविक येथे यादिवशी येऊन नवस करतात व मुलगा झाला की त्यास गोपीच्या पेहराव्यात येथे आणतात अशा शेकडो गोपिका या ठिकाणी जमतात.
रासक्रीडा भजनांचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रभर व्रज भाषेतील १०५ भजनांचे गायन केले जाते. जी भजने संत कबीर, नरसिंह स्वामी, यांनी रचलेली श्री कृष्ण व राधा यांच्या प्रेमाचे व विरहाचे तसेच भक्तीचे वर्णन असलेली व केदार, सारंग, जयजयवंती, अडाना, सोरट, भूप, प्रभात, तोडी, कल्याण, मालगौडा, सामेरी, कानडा, परज, मालू, बिलावर, मालकौंस, रामकली, भैरवी, नायकी, आदी रागदारीतील १०५ भजनांचे गायन अखंडपणे रात्रभर गायली जातात. गोपिगीतासह काही भजनांचा अर्थ ही विषद केला जातो. यानंतर सकाळी ८:३० वाजता रासचक्र स्तंभावरून उतरवून कार्यक्रमाची सांगता होते. यानिमित्ताने येथे मोठी यात्रा भरते. रासक्रीडाउत्सव बघण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेश येथून हजारो भाविक येतात.
हेही वाचा - करून गेलं गाव अन् भलत्याचं नाव, अशी सध्याची भाजपची अवस्था - पवार