नाशिक - दुपारी साडेतीन वाजल्यापासून नाशिक शहरासह गंगापूर धरण परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. अवघ्या दीड तासात धरण परिसरात 103 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे गटारी, नाले यांचे प्रदूषीत पाणी गोदावरी नदीत मिसळले असून गोदावरीला पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने नदिवरील गाडगे महाराज पुलाखाली 8 ते 9 वाहने अड़कून पडली आहेत.
ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा अन् पावसाच्या जोरदार आगमनामुळे नागरीकांची अक्षरश: दाणादाण उडाली होती. यामुळे नाशिककरांना हवेतील गारव्याचा सुखद अनुभवही मिळाला. एकतर लॉकडाऊन त्यात उकाड्याने हैराण होताच अचानक आकाशात ढग दाटून आले. जोरदार पावसाने सगळ्यांना ओलेचिंब केले. शहराच्या मध्यवर्ती परिसरात दुपारच्या दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावली. पहिल्याच पावसात नाशिक महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचे पीतळ उघडे पडले. काही भागात तर पाण्याचे तळे साचल्याचे चित्र पहावयास मिळाले.
साडेतीन वाजेपासून पाच वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरातील मुंबईनाका, गंगापूररोड, रविवार कारंजा, द्वारका या भागांत नागरिकांची तारांबळ उडाली होती. शहरातील नाशिकरोड, सिडको, इंदिरानगर, देवळालीगाव, पंचवटी, आदी परिसरात पावसाने जोरदार झाला आहे. मान्सूनचे नियोजीत वेळात आगमन झाल्याने बळीराजाही सुखावला असून यानंतर आता पेरण्यांनाही सुरूवात होईल.
गोदावरी नदीला पावसाळ्यात येणारे पहिले दोन-तीन पूर हे मानवनिर्मित असून, नैसर्गिक नाले बुजवण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिकेने काही नाल्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडले आहे. तसेच भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट कामामुळे हे पूर येत असल्याचा आरोप गोदावरी प्रेमी देवांग जाँनी यांनी केला आहे .