नाशिक- गेल्या दोन दिवसापासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. इगतपुरी तालुक्यात संततधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. आज इगतपुरीत 212 मीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत इगतपुरीत 1975 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
संततधार पावसामुळे भावली धरण शंभर टक्के तर दारणा धरणात 89 टक्के पाणी साठा झाला आहे. घोटी सिन्नर मार्गावरील धोकादायक समजल्या जाणाऱ्या देवळा येथील पुला खालून वेगाने पाणी वाहत असून पुलावरून पाणी आल्यास महामार्ग ठप्प होऊ शकतो. इगतपुरी तालुक्याच्या सर्व भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. काही ठिकाणी पुलावरून रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंडे गावाला जोडणाऱ्या मोहोळ पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सुरक्षेसाठी या भागातील वाहतूक थांबवण्यात आली आहे. या भागातील परिस्थितीवर तालुका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा लक्ष ठेऊन असून यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जोरदार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील निरपण येथील राजू वारे हा व्यक्ती शेतातून घरी जात असताना नदीच्या पाण्यात वाहून गेला आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.