नाशिक - शहरातील कुठलाच नागरिक भुकेला राहू नये या उद्देशाने फिडिंग इंडिया संस्थेकडून हॅपी फ्रिज संकल्पना राबवली जात आहे. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून घरातील किंवा हॉटेलमधील उरलेले अन्न फ्रीजमध्ये संकलित केले जाते. त्यानंतर त्या अन्नाचे गरजूंना वाटप केले जाते. वर्षभरामध्ये शहरातील जवळपास ४० हजार भुकेल्यांपर्यंत या संस्थेने अन्न पोहोचवले आहे.
अन्न हे परब्रम्ह आहे, असे म्हटले जाते. मात्र, तरी सुद्धा घरात आणि हॉटेलमध्ये कितीतरी अन्न वाया जात असते. हेच वाया जाणारे अन्न एखाद्या भुकेल्यांच्या मुखी जावे यासाठी फिडिंग इंडिया संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेमार्फत शहरातील हॉटेल, शाळा, महाविद्यालयामधून वाया जाणारे अन्न संकलित केले जाते. ते व्यवस्थित गरम करून कंटेनरमध्ये भरून गरजूंपर्यंत पोहोचवले जाते. याचाच एक भाग म्हणून नाशिक रोड भागात 'हॅपी फ्रिज' ही संकल्पना राबवली जात आहे.
नागरिक उरलेले अन्न या फ्रिजमध्ये ठेवतात. ज्या भुकेल्यांना अन्नाची गरज आहे ते या फ्रिजमधून अन्न घेऊन खाऊ शकतात, असा हा उपक्रम आहे. यासोबतच जुने कपडे देखील याठिकाणी संकलित केले जाते आणि गरजूंपर्यंत पोहोचवले जातात.
शहरातील कुठलाच नागरिक भुकेला राहू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी हॅपी फ्रीज बसवण्याचा संस्थेचा मानस आहे. या उपक्रमात पूनम कणव, सतपाल सिंग चड्डा, अने थॉमस, प्रशांत पाटील, निशा देशमुख, संदीप महाजन, मंगल इडगल, भारती ग्रेतकर, महेंद्र ग्रेतकर, दिलीप गंगवाणी हे सदस्य प्रयत्नशील आहेत.