नाशिक - दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही पहिल्याच पावसात नाशिकचा सराफ बाजार चर्चेत आला आहे. महानगर पालिकेची कोट्यवधी रुपयांची पावसाळी गटार योजना यंदाही पाण्यात गेली आहे. सराफ बाजारात तातडीने उपाययोजना करण्याऐवजी नेत्यांच्या दौऱ्यांचा महापूर पहायला मिळाला. सालाबादप्रमाणे सराफ व्यावसायिकांसह नुकसानग्रस्तांचे सांत्वन करत आश्वासन दिले आहे. मात्र, नेहमीप्रमाणे आश्वासन मिळाले असले तरी व्यावसायिकांनी नेत्यांच्या दौऱ्यावर टीका करत भ्रष्टाचारापलीकडे काहीही होणार नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
पावसाळा आणि सराफ बाजारासह परिसर अवघ्या दोन तासांच्या पावसात तुडुंब भरतो. कुणाच्या दुकानात गुडघाभर पाणी तर कुणाचं अर्ध दुकानात पाण्यात जातं. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती असल्यानं व्यावसायिक संताप व्यक्त करत असतो. वर्षानुवर्षे पावसाळी गटार योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही व्यावसायिकांची फजिती होत असते. यंदाही पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी दौरे करत कायमस्वरूपी तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे.
मात्र, वर्षानुवर्षे हीच उत्तर ही स्थानिक नगरसेवकांना मिळत असल्याने तेही याचे सगळे खापर महापालिकेतील अधिकाऱ्यांवर फोडत आहे. तर व्यावसायिकांनी मात्र आमची परिस्थिती बदलेल याची खात्री नसली तरी भ्रष्टाचार मात्र नक्की होईल, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
मागील दोन दिवसात जोरदार पाऊस झाल्यामुळे गोदावरीच्या पात्रात पाणी साचले आणि सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न झाल्याने पाणी वाहून जाण्याऐवजी ते सखल भागात गेले. त्यामुळेच सराफ बाजार परिसरात दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. यावर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
2008 साली सुद्धा अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली होती. अलीकडच्या काळात या भागात पावसामुळे नियमितपणे पाणी साठताना दिसत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून, महापालिकेच्या सन्मवयातून तज्ञ अभियंते यांच्या सल्ल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, असे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री मंत्री भुजबळ यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा - 'सरकारमध्ये कुरबुरी असल्या म्हणजे सरकार पडणार आणि आम्हाला संधी मिळणार असे समजू नये'