नाशिक : मराठी भाषा दिनानिमित्त नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गीता, ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. या ग्रंथ दिंडीत कवी, साहित्यिक, लेखक यांच्यासह शासकीय अधिकारी सहभागी झाले होते.
म्हणून तात्यासाहेब कुसुमाग्रज झाले : कवी तात्यासाहेब शिरवाडकर यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. तात्यासाहेबांचे वडील वकील होते. वकिलीच्या व्यवसायासाठी ते नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले. कुसुमाग्रजांचे बालपण पिंपळगाव येथेच गेले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि एक लहान बहीण होती. एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.
कुसुमाग्रज यांचे साहित्य : कुसुमाग्रज यांच्या कविता आजही सुप्रसिद्ध आहेत. त्यात किनारा, अक्षरबाग, चाफा, जाईचा कुंजा, छंदोमयी, थांब सहेली, जीवन लहरी, पांथेय, प्रवासी पक्षी, मराठी माती, मारवा, महावृक्ष, माधवी, विशाखा, श्रावण, समिधा, वादळ वेळ अशा प्रकारचे विविध कविता संग्रहचा समावेश आहे. तसेच खेळायला जाऊ चला, फुलांची विनंती, आमची मांजर, आदी प्रसिद्ध बालकविता आहेत. कुसुमाग्रज यांचे कथा संग्रहसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. काही वृद्ध काही तरुण, अंतराळ, एकाकी तारा, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, एका बारा निवडक कथा, सतारीचे बोल, फुलवारी असे विविध कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. कुसुमाग्रज यांची नाटकेसुद्धा प्रसिद्ध आहेत. ययाती आणि देवयानी, शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकाचा दुसरा पेशवा, आमचं नाव बाबूराव, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट अशा प्रसिद्ध नाटकांचा समावेश होतो.
कुसुमाग्रज यांना मिळालेले पुरस्कार : कुसुमाग्रज यांना साहित्य लेखनासाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत. कुसुमाग्रजांना नटसम्राट या नाटकाला साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर अखिल भारतीय परिषदेचा राम गणेश गडकरीपुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर कुसुमाग्रजांना संगीत नाट्यलेखन पुरस्कार मिळाला. कुसुमाग्रजांना साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा : Farm Pond Scheme: शेततळ्यांच्या माध्यमातून पाणी प्रश्नावर मात; शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा