नाशिक - येथील ब्युटी पार्लर व्यावसायिकांचे व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद आहेत. यामुळे त्यांचे प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्यात यावे. तसेच व्यवसाय बंद असल्याने अडचणीत सापडलेल्या या व्यावसायिकांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी येथील ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली आहे.
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार मागील दीड महिन्यापासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. नाशिक शहरात शेकडो ब्युटी पार्लर असून यावर हजारो महिला कामगार उदरनिर्वाह आहेत. सलून व्यवसाय सोबत ब्युटी पार्लर व्यवसायदेखील बंद असल्याने कामगारांचा पगार, दुकानाचे भाडे, घर खर्च कसा करायचा? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेही वाचा - अमरावतीत रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड
लसीकरणासह आर्थिक मदतीची मागणी -
ब्युटी पार्लरमध्ये गेल्याने कोरोनाचा प्रसार होतो, हे चुकीचे आहे. आतापर्यंत आम्ही व्यवसाय करताना मास्क, सॅनिटाझरसारख्या कोरोना नियमांचे पालन करत आलो आहे आणि यापुढे देखील करत राहू. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे शासनाने ब्युटी पार्लर व्यावसायिकांना लसीकरणासाठी प्राधान्य देऊन आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली असल्याचे ब्युटी पार्लर असोसिएशनच्या अध्यक्षा ललिता पाटोळे, रत्ना कापडणीस आणि कविता चौधरी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - पोलीस निरिक्षक पतीचा कोरोनाने मृत्यू, तिसऱ्याच दिवशी डॉक्टर पत्नी कामावर झाली रुजू