इगतपुरी(नाशिक)- इगतपुरी तालुक्यातील ओंडली शिवारात दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या युवकाच्या बेवारस मृतदेह प्रकरणाचा उलगडा करण्यात घोटी पोलिसांना अवघ्या काही तासातच यश आले आहे. मृत युवक त्याच्या प्रेयसीच्या लग्नामध्ये अडथळा ठरेल, या भीतीने प्रेयसीच्या आईने दोन व्यक्तींच्या मदतीने हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत युवकाचे नाव पंडित ढवळू खडके असे आहे. पोलिसांनी या प्रकरणी युवकाच्या प्रेयसीच्या आईला आणि इतर दोघांना अटक केली आहे.
तळेगाव जवळील कातोरवाडी येथील पंडित खडके याचे चांगुणाबाई गणपत मेंगाळ हिच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. पंडित खडके याने या मुलीच्या घरच्यांकडे लग्नाची मागणीही घातली होती. मात्र, मुलीच्या घरच्यांनी ही मागणी अमान्य करत तिचे दुसऱ्या ठिकाणी लग्न जमवले होते. दरम्यान, या लग्नात पंडित हा विघ्न आणेल आणि अडथळा निर्माण करेल अशी भीती चांगुणाबाई मेंगाळ यांना होती. या भीतीपोटी चांगुणाबाई हिने मोखाडा तालुक्यातील बोटोसी येथील पहिल्या पतीचा मुलगा विलास प्रथम गावंडा याच्यासह एक व्यक्तीच्या मदतीने पंडित खडके याची हत्या केली. यानंतर खडके याचा मृतदेह ओंडली शिवारात निर्जनस्थळी फेकून दिला.
दरम्यान, पंडित खडके बेपत्ता झाल्याने त्याचा घरच्यानी सर्वत्र शोध घेतला आणि इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. ओंडली शिवारात या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्यासह हवालदार सुहास गोसावी, शीतल गायकवाड यांनी सखोल तपास करत या युवकाच्या खुनाचा उलगडा केला.