दिंडोरी (नाशिक) - सप्तश्रृंगी गडावर आज (शनिवारी) शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. सकाळी साडेसात वाजता देवीचे दागिने, सोन्याचे मंगळसूत्र, कोयरी हार, गुलाब हार, वज्रतिक, नथ, मुकुट, कंबरपट्टा, तोडे पादुका, कर्णफुले, पैंजण, चांदीचे छत्र यांचे पुजन न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. तेथून फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणाने अलंकार गडावरती भगवतीच्या मंदिरात नेण्यात आले.
जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका हे आहेत. 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तश्रृंगी देवी अनेक कुटुंबांची कुलदैवत आहे.
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळस्थान आहे, असेही सांगितले जाते. या सप्तश्रृंगी गडावर देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे, असेही सांगितले जाते. या सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.
दरम्यान, आज (शनिवारी) सकाळी साडेसात ते नऊ वाजेच्या सुमारास मुख्य पुजारी घनश्याम दीक्षित आणि पुरोहित संघाच्या सर्व गुरुजींच्या मंत्रोघोषात पंचामृत अभिषेक करून देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर घटस्थापना करण्यात आली. नंतर पुरोहीत संघाच्या वतीने फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सप्तसती पाठ आणि कोरोना महामारी नष्ट व्हावी, यासाठी जप व प्रार्थना करण्यात आली.
या नवरात्रोत्सवादरम्यान, सप्तशृंगी देवीचे नित्यनेम सकाळी काकड आरती, सात वाजता पंचामृत पुजा, मध्यन्य (नैवद्य आरती) आरती, सायकांळी सहा वाजता शांतीपाठ (शांती सुक्त), पारंपारिक खडक बान (शेरूशाही), त्यानंतर सांज आरती अष्टमीला होमहवन शत चंडीयज्ञ, नवमीला पुर्ण आहूती असे कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती सप्तश्रृंगी गडाचे पुजारी प्रमोद दीक्षित यांनी दिली.