नाशिक - संपूर्ण राज्यभरात एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना, अनेक कोरोनाबाधित रुग्ण एकतर रुग्णालयात किंवा कोरोना सेंटरमध्ये आपल्या परिवारापासून दूर राहून उपचार घेत आहेत. मात्र, नाशिकच्या ठक्कर डोममध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये वेगळं चित्र बघायला मिळत आहे. या ठिकाणी महिला रुग्णाच्या हस्ते मोठ्या उत्साहात बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे.
एकीकडे नाशिक जिल्ह्यावर कोरोणाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. यामुळे अनेक लोक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. यात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होऊन ते नैराश्यात जात असल्यामुळे नाशिकमधील अनेक कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या मनोरंजनासाठी विविध सोयी उपलब्ध करून दिल्याच बघायला मिळते. अशाच प्रकारे या गणेशोत्सव काळात शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ठक्कर डोम मध्ये 300 खाटांचे कोवव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणारे रुग्णही सध्या आपल्या घरी बाप्पा आल्यानंतर जो उत्साह असतो तोच उत्साह अनुभवत आहेत.
या कोव्हिड सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या महिला रुग्णाच्या हस्ते बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. तर दुसरीकडेे या ठिकाणी उपचार घेणारे लहान मूल देखील संगीत खुर्ची, लपंडाव, कॅरम , बुद्धिबळ असे खेळ खेळताना बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे इथे उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील दिलासादायक आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे आपल्या घरापासून दूर असलो तरी मात्र उपचार घेत असलेल्या ठिकाणी बाप्पाची सेवा करायला मिळत असल्याने या रुग्णांमध्ये देखील उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे या रुग्णांकडून क्रेडायी आणि प्रशासनाचे आभार मानण्यात येत आहेत.