नाशिक - मालेगाव तालुक्यातील साकुरी झाप गावाचे भूमिपुत्र व भारतीय सेनेच्या इंजिनिअर रेजिमेंटचे जवान सचिन मोरे यांना भारत-चीनच्या सीमेवरील गलवान खोऱ्यातील नदीत आपल्या सहकारी जवानांना वाचविताना वीरमरण आले. आज त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील नागरिकांनी अमर रहे..अमर रहे..सचिन मोरे अमर रहे..अशा जयघोषात आपल्या लाडक्या भूमिपूत्राला साश्रूनयनांनी जड अंत:करणाने अखेरचा निरोप दिला.
मागील काही दिवसांपासून, गलवान खोऱ्यातील भारत-चीनच्या नियंत्रण रेषेवर, चिनी सैन्याकडून कुरापती वाढल्याने तणाव निर्माण झाला आहे. या सीमेवर भारताच्या वीसपेक्षा अधिक जवानांना वीरमरण आले आहे. भारत-चीन सैन्यातील वाढता संघर्ष लक्षात घेता, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गलवान खोऱ्यातून वाहणाऱ्या एका नदीवर भारतीय सैन्याची एक तुकडी पूल उभारणी करित होती. तेव्हा चीनने रोखलेला पाण्याचा प्रवाह अचानक सोडला. यात तीन भारतीय जवान सापडले. त्यांना वाचवण्यासाठी सचिन मोरे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, खाली मोठ्या दगडावर पडल्याने त्यांना वीरमरण आले. सचिन यांची वार्ता साकुरी झापमध्ये समजल्यानंतर अख्खे गाव कडकडीत बंद झाले. तसेच जिल्हाभरातून शोक व्यक्त करण्यात येत होता.
आज सचिन यांचे पार्थिव त्याच्या मूळगाव साकुरी झाप येथे आणण्यात आले. तेव्हा गावकऱ्यांना हुंदका अनावर झाला. मोरे यांच्या गावातील घराजवळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत तिरंग्यात लपटलेले पार्थिव गावातील प्रमुख रस्त्यावरून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. रस्त्यावर श्रध्दांजलीपर रांगोळी काढण्यात आली होती. पार्थिव जात असताना नागरिक घरासमोरून अंत्यदर्शन घेत होते.
सचिन यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, माजी संरक्षण मंत्री सुभाष भामरे हे उपस्थित होते. तेव्हा जमलेल्या नागरिकांनी, अमर रहे..अमर रहे..सचिन मोरे अमर रहे..अशा जयघोषात आपल्या लाडक्या भूमिपूत्राला साश्रूनयनांनी, जड अंत:करणाने, अखेरचा निरोप दिला. सचिन यांच्या मागे आई, वडील, पत्नी, 2 मुली आणि 6 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.
हेही वाचा - मालेगावातील जवानाला गलवान खोऱ्यात वीरमरण
हेही वाचा - महाराष्ट्राच्या सुपुत्राला गलवान येथे वीरमरण; साकुरी झाप गावावर शोककळा