नाशिक - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना म्यूकरमायकोसिस आजाराने ग्रासले आहे. मालेगावात आतापर्यंत म्यूकरमायकोसिने 4 जणांचा बळी गेला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 19वर जाऊन पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोनामुक्तीनतंर म्यूकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव होत असल्याचे लक्षात आले आहे. या आजारात रुग्णांच्या नाकात, डोळ्यात काळी बुरशी येत जखमा होत आहेत. या आजारावर वेळेवर उपचार केले नाही तर रुग्णांचे डोळे, दात काढावे लागत आहे. तसेच वेळेवर उपचार मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात मालेगावमध्ये आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी दिली.
हेही वाचा - नाशिक : बाजार समितीत ३४४ टेस्टमध्ये अवघे ४ पॉझिटिव्ह
आजाराची लक्षणे -
कोरोना रुग्णाच्या चेहऱ्यावर डोळ्याला सुज येणे, दिसायला बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोकेदुखी, गिळायला त्रास होणे अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. अशा वेळी जर अशी लक्षणे दिसली तर जवळच्या कान-नाक-घसा तज्ञांशी संपर्क साधून उपचार सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा आजार बळावून रुग्ण दगावण्याची शक्यता असते, असे मत डॉ. शब्बीर इंदोरवाला यानी व्यक्त केले.
नाशिक शहरात 274 रुग्ण -
नाशिक शहरात म्यूकरमायकोसिसचे सद्यस्थितीत 274 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्यूकरमायकोसिस हा आजार नव्हता. मात्र, दुसऱ्या लाटेत मधुमेही कोविड रुग्णांमध्ये हा आजार जाणवत आहे. हा संसर्ग जन्य आजार नसून मात्र वेळीच त्याचे निदान होऊन त्यावर उपचार अथवा शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण कायम स्वरुपी बरा होऊ शकतो अथवा रुग्णाच्या जीवावर ही बेतू शकते.
हेही वाचा - नाशिक : लसीकरणासाठी ग्रामीण भागातील जनतेला अहिराणी भाषेत साद