नाशिक: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वणी- सापुतारा महामार्गावर आज 30 जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खोरी फाटा जवळ क्रुझर व मारुती सियाज कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले. दोन्ही गाड्या एकमेकांवर धडकल्याने मोठा आवाज झाला. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले. या अपघातातील मृतांमध्ये विनायक गोविंद क्षिरसागर (वय 37), योगेश दिलीप वाघ(वय 18), जतिन अनिल फावडे (वय 23, मोठा कोळीवाडा,वणी), रविंद्र मोतीचंद चव्हाण (वय 22) अशी यांचा समावेश आहे,
ही आहेत जखमींची नावे: तर जखमींमध्ये कमळी युवराज गांगोडे (वय 40), कल्पना सुभाष सोळसे (वय 19), तुळशीराम गोविंदा भोये (वय 28), ललीता युवराज कडाळे (वय 30), रोहिदास पांडुरंग कडाळे (वय 25), योगेश मधुकर सोळसे (वय 15), सुभाष काशिनाथ सोळसे (वय 15), देवेंद्र सुभाष सोळसे (वय 47), नेहल सुभाष सोळसे (वय 7) हे गंभीर जखमी झाले. या सर्वांना वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर त्यांना 108 रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महामार्गावर का वाढताहेत अपघात? गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशात अनेकांचा नाहक बळी जात आहे. एका सर्वेक्षणात महामार्गावर होणाऱ्या अपघातातील कारणे समोर आले आहेत. यात वाहनांचा अतिवेग, वाहनात तांत्रिक बिघाड, टायर पंक्चर होणे, चालक झोपी जाणे, लेनची शिस्त न पाळणे, ड्रिंक अँड ड्राईव्ह, तसेच प्रामुख्याने रस्त्यावर पडलेली खड्डे यामुळे महामार्गावरील अपघातात वाढ होत आहेत. सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने महामार्गावर वाहन चालवताना चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन राज्य परिवहन विभागाने केले आहे.
परप्रांतीय मजूर जखमी: आणखी एका वेगळ्या अपघातात परप्रांतीय मजूर मुंबईहून ट्रकने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. चांदवड घाटातील गतिरोधकामुळे कार हळू-हळू चालली होती. मात्र, ट्रक भरधाव वेगात असल्याने कारला वाचविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्ता दुभाजकावर जाऊन आदळला. यावेळी मागून येणारे दोन ट्रकही आदळले. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला. तसेच जखमींना मालेगाव आणि चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.